लातूर – लातूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. समाजात व्यसनाधीनता वाढविणाऱ्या तसेच तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध लातूर पोलीस ठाम भूमिका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला आहे.
दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूर शहरात अवैध अमली पदार्थांविषयी माहिती संकलन व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, लातूर ते बार्शी रोडवरील उड्डाणपुलाजवळील माउलीनगर, हरंगुळ येथे एक महिला आपल्या घरामध्ये गांजाची साठवण करून त्याची विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक, लातूर श्री. अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून सदर पथक माउलीनगर, हरंगुळ येथे पोहोचले. संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. घरामध्ये एक महिला आढळून आली. तिची ओळख मनिषा बालाजी चव्हाण (वय 30 वर्षे, रा. माउलीनगर, हरंगुळ, ता. जि. लातूर) अशी पटली. घराची तपासणी करण्यात आली असता लोखंडी कपाटामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांजासदृश पदार्थ आढळून आला.
सदर पदार्थाची तपासणी केलीतेव्हा तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पंचांच्या उपस्थितीत वजन केले असता एकूण 2 किलो 830 ग्रॅम गांजा मिळून आला असून त्याची अंदाजे किंमत रु. 56,600/- इतकी असल्याचे निष्पन्न झाले. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.
ही कारवाई नायब तहसीलदार श्री. गणेश अंबर, वजनमाप निरीक्षक श्री. टेकाळे, तसेच राज्य परिवहन महामंडळाचे पंच यांच्या उपस्थितीत पार पडली.
सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, तसेच पोलीस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मोहन सुरवसे, सचिन धारेकर सुरेखा मदने, मनोज खोसे, प्रवीण कोळसुरे, आनंद हल्लाळे, संतोष खांडेकर, सुहास जाधव, चिखलीकर यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून अशा बेकायदेशीर धंद्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी लातूर पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील आहे.

