लातूरात अनधिकृत बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे निर्देश

SHARE:

लातूर / प्रतिनिधी: शहरातील अनधिकृत बॅनर तात्काळ हटवावे. पुन्हा- पुन्हा अनधिकृत बॅनर लावले जात असतील तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे आदेश मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी दिले.

आयुक्त श्रीमती मानसी यांनी सोमवारी अतिक्रमण हटाव विभागाची बैठक घेतली.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड,डॉ. पंजाबराव खानसोळे, अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष रणदिवे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती मानसी म्हणाल्या की, शहरात ठिकठिकाणी दिसणारी बॅनर काढून टाका.संबंधितांना सूचना करा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा.एवढे करूनही पुन्हा बॅनर लावले गेले तर त्या व्यक्तींच्या विरोधात फौजदारी खटले दाखल करा, असेही श्रीमती मानसी म्हणाल्या.

शहरातील काही ठिकाणी बॅनर लावता येतील काय? याचीही तपासणी करावी. काही ठिकाणी मनपाने जागा निश्चित कराव्यात.अल्पकाळासाठी शुल्क आकारून येथे बॅनर लावण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे होतात,अशी ठिकाणे शोधून काढा.ज्या ठिकाणी अतिक्रमणे होतात त्या ठिकाणी अतिक्रमण विभागाने लक्ष ठेवावे. अतिक्रमणे हटवावीत.वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी सतत गस्त घालून अतिक्रमण होऊ नये, याची दक्षता घ्यावी,असेही श्रीमती मानसी म्हणाल्या.

Leave a Comment

Follow Us Now