कॉपर वायर चोरी प्रकरणात इंस्टाग्राम वर “क्वीन” रील स्टार नावाने प्रसिद्ध असलेली तरुणी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ; ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

SHARE:

लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवून तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार व सततची गस्त याच्या माध्यमातून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई करत एका महिला आरोपीस जेरबंद करून तिच्याकडून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
दि. २७/०५/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वात पोउपनि प्रमोद देशमुख यांचे पथक लातूर शहर परिसरात संशयितांची पडताळणी व गुन्हेगारांची माहिती घेत होते दरम्यान दुपारी १३.२० वाजण्याच्या सुमारास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, यशवंत शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या कडेला एक महिला चोरीच्या कॉपर वायर विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन संशयास्पदरित्या थांबलेली आहे. तसेच सदर महिला वारंवार कॉपर वायर चोरी करून भंगार विक्रेत्यांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
प्राप्त माहितीनुसार पोलिस पथकाने सापळा रचून वर्णनाप्रमाणे एक महिला संशयित अवस्थेत उभी असल्याचे दिसून आली. महिला पोलीस अंमलदारामार्फत तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली असता तिने आपले नाव
१) प्रिया जितेंद्र कांबळे, वय १९ वर्षे, रा. विलास नगर, लातूर असे सांगितले.त्यानंतर तिच्या ताब्यातील लाल रंगाच्या पिशवीची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये रोख रक्कम आढळून आली. सदर रक्कमेबाबत विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने प्रकाश नगर परिसरातील बुद्धविहारासमोरील सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणावरून लाईटचे कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले कॉपर वायर तिने फिरत्या भंगार विक्रेत्यांना विक्री करून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःजवळ ठेवल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर लातूर जिल्हा पोलीस अभिलेखाची पडताळणी करण्यात आली असता पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी., लातूर येथे गुरनं २७२/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये कॉपर वायर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी महिला प्रिया कांबळे हिच्या ताब्यातून चोरीच्या कॉपर वायर विक्रीतून प्राप्त झालेले एकूण ४१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर महिला आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी तिला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेसंदर्भात अधिक माहिती घेतली असता इंस्टाग्राम वर *क्वीन रील स्टार* नावाने प्रसिद्ध असलेली ही तरुणी तिचे जवळपास 32 हजार फॉलोवर्स असल्याचे आढळून आले.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे तसेच महिला पोलीस अंमलदार मदने यांनी केली आहे

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now