लातूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत लातूर जिल्हा पोलीस दलाने कठोर व प्रभावी कारवाई करत दर्गा च्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी केलेल्या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेऊन गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. धार्मिक स्थळांवरील अशा घटनांमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात विशेष मोहीम राबविली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.
मौजे कवा, ता. निलंगा येथील दर्ग्यामध्ये अज्ञात इसमाने कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेत दर्ग्यातील धार्मिक महत्वाच्या चांदीच्या वस्तू, विशेषतः चांदीचे घोडे व पाळणे चोरीस गेले होते. या प्रकरणी पो.स्टे. लातूर ग्रामीण गुरनं २४९/२०२५ कलम ३३१(४), ३०५(अ) भा.न्या.सं.
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक २६/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने तपास सुरू ठेवला असता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदपूर येथे संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याने आपले नाव
१)इस्माईल दस्तगिर शेख (वय ४३ वर्षे, रा. इनामनगर किल्लारी, ता. सध्या राहणार दापका निलंगा, जि. लातूर)
असे सांगितले. चौकशीत गुन्ह्याची कबुली सखोल चौकशीत आरोपीने कबूल केले की, त्याने मौजे कवा येथील दर्ग्याचे कुलूप तोडून तेथील धार्मिक चांदीच्या वस्तू चोरी केल्या होत्या.
आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याकडून चांदीचे घोडे – ११७ नग, चांदीची लहान व मोठी पाळणे – १९८ नग असा एकूण ४ किलो ६१६ ग्रॅम वजनाचे
अंदाजे किंमत : ₹२,३०,०००/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ,पोलीस अमलदार माधव लक्ष्मण बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, तुराब पठाण,मोहन सुरवसे,विजय पाटील, श्रीनिवास जांभळे यांनी केली आहे.
आरोपीस पुढील तपास कामी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण गुरनं २४९/२०२५ या गुन्ह्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सर्व धार्मिक स्थळांवरील चोरी, तोडफोड किंवा कोणत्याही प्रकारचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणारआहे असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.




