लातूर जिल्ह्यातील मौजे साई येथे फोफावलेली अवैध दारु विक्री आणि
त्यामुळे ढासळलेली कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी तरुण कार्यकर्ते श्री.
सुरज दत्तात्रय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे २५
मार्चपासून सुरू केलेले उपोषण, प्रशासनाच्या आश्वासनानंतर २६ मार्च रोजी
रात्री ८ वाजता मागे घेण्यात आले आहे.
साई गावात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारु विक्रीमुळे मद्यपींचा त्रास
वाढला असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या अवैध
धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई
करावी, या प्रमुख मागण्यांसाठी श्री. सुरज पाटील उपोषण सुरू केले होते.
या उपोषणाची माहिती मिळताच राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे
मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने दखल घेण्याच्या
सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. अभय
साळुंखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संतोष देशमुख, श्री. राजकुमार
पाटील आणि पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन
उपोषणकर्त्यांशी संवाद साधून, मागण्या जाणून घेतल्या. यानंतर याप्रश्नी
जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी
लोकप्रतिनिधींनी केली.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, अवैध व्यवसायांवर कडक कारवाई
करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर श्री. सुरज दत्तात्रय पाटील
यांनी आपले उपोषण सोडले.
यावेळी साई गावचे उपसरपंच अमोल पवार, बापूराव पवार, परमेश्वर पवार
यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी आणि महिला उपस्थित होत्या. गावकरी आणि
महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला आता या अवैध धंद्यांविरुद्ध
ठोस पावले उचलावी लागणार आहेत.




