तक्रारदाराची फाईल बंद करण्यासाठी लाचेची मागणी; जळकोट येथील खाजगी इसमावर एसीबीची कारवाई

SHARE:

लातूर (प्रतिनिधी):
तहसील कार्यालयातील प्रलंबित फाईल बंद करण्यासाठी आणि पुढील तारखा न लावण्यासाठी एका खाजगी इसमाने लोकसेवकावर प्रभाव पाडण्याचे आमिष दाखवून लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), लातूरने सापळा रचून पडताळणी केल्यानंतर, आरोपी अजय आनंद लद्दे (वय ३४, रा. जळकोट) याच्याविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा सविस्तर तपशील:
तक्रारदार यांच्यावर जळकोट पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी जळकोट तहसील कार्यालयात सुरू आहे. या कामासाठी तक्रारदाराला वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.या परिस्थितीचा फायदा घेत आरोपी अजय लद्दे याने १३ मार्च २०२६ रोजी तक्रारदाराशी संपर्क साधला. “मी लोकसेवकावर आपला प्रभाव पाडून तुमची फाईल बंद करून देतो आणि यापुढे तारखा लागायला नको असतील तर २,००० रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी त्याने केली.एसीबीची कार्यवाही:
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्याकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरून २४ मार्च २०२६ रोजी पथकाने पडताळणी केली असता, आरोपीने २,००० रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्याच दिवशी सापळा रचण्यात आला, मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तपास पथक: सदर कारवाई लाप्रवि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, लातूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक जगदीश राऊत व त्यांच्या पथकाने केली आहे.

एसीबीचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असेल, तर तात्काळ लाप्रवि लातूर कार्यालयाशी (०२३८२-२४२६७४) किंवा टोल-फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Follow Us Now