मार्च 2026 महिन्यात विशेष पथकाने विविध पोलीस ठाण्यांतील पाहिजे आरोपींवर प्रभावी कारवाई करत एमआयडीसी (06), विवेकानंद चौक (02), औसा (01) व शिरूर अनंतपाळ (01) असे एकूण 10 आरोपींना अटक करून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये हजर केले आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने उल्लेखनीय व धाडसी कारवाई करत तब्बल 19 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बाहेरील जिल्ह्यातून अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. या कारवाईमुळे 2007 मधील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा उलगडा होऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाला निर्णायक दिशा मिळाली आहे.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नं. 119/2007 अंतर्गत भादंवि कलम 420, 467, 468, 471, 34 तसेच स्फोटक पदार्थ कायदा व मुंबई दारूबंदी कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी जफर अब्दुल सत्तार पठाण (वय 52 वर्ष, रा. बालाजी नगर, बीएसएनएल ऑफिसजवळ, उमरगा, जि. धाराशिव) हा गेल्या 19 वर्षांपासून फरार होता.
दिनांक 09/07/2007 रोजी राजीव गांधी चौक परिसरात वाहनातून एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल (रेक्टीफाईड स्पिरीट) बेकायदेशीररीत्या वाहतूक करीत असताना पोलिसांनी छापा मारला तेव्हा आरोपी जफर पठाण हा पळून गेला होता. वाहनातून 200 लिटर क्षमतेचे 2 बॅरल व संगम ट्रान्सपोर्ट येथून आणखी 12 बॅरल असे एकूण 14 बॅरल स्पिरीट जप्त करण्यात आले होते.संबंधित आरोपींनी बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करून शासनाचा महसूल चुकवण्याच्या उद्देशाने स्पिरीटची बेकायदेशीर आयात-निर्यात केली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जफर पठाण यास मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथून दिनांक 26/07/2007 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र त्यानंतर तो न्यायालयात हजर न राहता सतत वास्तव्य बदलून फरार राहत होता.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आरोपी जफर पठाण राहणार उमरगा (जि. धाराशिव) त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे रिपोर्टसह हजर करण्यात आले. सदर आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. सतिश पाटील यांनी दिनांक 06/04/2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदरची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे व दयाराम सूर्यवंशी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




