लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावर तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस दलाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेने माहे मार्च २०२६ दरम्यान व्यापक, नियोजनबद्ध आणि परिणामकारक मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्हाभर सातत्यपूर्ण छापेमारी, माहितीचे संकलन आणि समन्वयित कारवाईद्वारे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ०५,४०,८३,६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात विविध प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात शेकडो गुन्हे नोंदवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश ठेवण्यात आले आहे. विशेषतः अवैध मद्यविक्री, जुगार, अमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
यामध्ये
👉🏻 अवैध दारू विक्री व गावठी दारूनिर्मिती बाबत २५७ गुन्हे नोंदवून ₹१२,८१,७८५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,
👉🏻जुगार विरोधी ७७ कारवायांमधून ₹२९,८३,९६०/- इतकी रक्कम जप्त करण्यात आली.
👉🏻अमली पदार्थांविरोधात कारवाई करताना गांजा प्रकरणी ०१ गुन्हा दाखल करून ₹५,२२,०७५/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
👉🏻आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेत गुटखा तस्करीविरोधात २० गुन्हे नोंदवून तब्बल ₹६६,८८,३४५/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
👉🏻याशिवाय पर्यावरण व नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी १५ गुन्ह्यांमध्ये ₹४,२६,०७,५००/- इतका प्रचंड मुद्देमाल जप्त करण्यात आला, ही कारवाई विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
👉🏻कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आर्म अक्ट अंतर्गत १३ गुन्हे नोंदवून प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून स्वतंत्रपणे राबविण्यात आलेल्या कारवायांमध्ये 👉🏻दारू विषयक १८ गुन्हे (₹२,६५,८८०/-),
👉🏻जुगाराचे १२ गुन्हे (₹८१,४९०/-)
👉🏻गांजा ०१ गुन्हा (₹५,२२,०७५/-)
👉🏻गुटखा ०४ गुन्हे (₹३,४०,३०५/-)
👉🏻अवैध वाळू प्रकरणी ०१ गुन्हा (₹५,०५,०००/-)
👉🏻आर्म अक्ट अंतर्गत ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही सर्व कारवाई केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून, लातूर पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील ठाम भूमिका, कार्यक्षमता आणि सक्रियता अधोरेखित करणारी आहे. अवैध धंद्यांमुळे समाजाच्या आरोग्यावर, कायदा-सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता, अशा कारवाया सातत्याने व अधिक तीव्रतेने राबविण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




