चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शक, नियोजनबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार.

SHARE:

लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे लेखी परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. सदर परीक्षेसाठी गुणवत्ता यादीतील एकूण (२६२) उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी (२४१) उमेदवारांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर (२१) उमेदवार गैरहजर राहिले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अत्यंत काटेकोर नियोजन व सक्षम अंमलबजावणीमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून लेखी परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.उमेदवार उपाशीपोटी परीक्षा देऊ नयेत यासाठी उमेदवारांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना नाश्त्यामध्ये बिस्किटे, केळी,उपमा देण्यात आला.उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व सुविधांमुळे उमेदवारांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहून परीक्षा देणे शक्य झाले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे स्वतः परीक्षा केंद्रामध्ये हजर होते. त्यांनी परीक्षा कक्षांची पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम व सुरळीत पार पाडण्यास मार्गदर्शन केले.
सदरची चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात सर्वत्र अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा हॉलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय, प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये स्वतंत्रपणे पूर्णवेळ व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले असून सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसला.
परीक्षेची निष्पक्षता अबाधित राहावी यासाठी उमेदवारांसोबतच परीक्षा केंद्रावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.

सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) ही लातूर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावरही ती लावण्यात आली आहे. उमेदवारांना कोणतेही आक्षेप असल्यास ते २४ तासांच्या आत खालील माध्यमांतून नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे – ई-मेल : sp.latur@mahapolice.gov.in
दूरध्वनी : ०२३८२-२४२२९६
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही,

संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिस्तबद्ध नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबाबत उमेदवारांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Comment

Follow Us Now