शिरूर अनंतपाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता बैठकीत वादाचा सामोपचाराने निपटारा.

SHARE:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मौजे आरी येथे गतवर्षी उद्भवलेल्या वादाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी शिरूर अनंतपाळ येथे पंचायत समिती कार्यालयात सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 या वेळेत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र चौधर, तहसीलदार श्री. यादव, गटविकास अधिकारी श्री. वरंडेकर, पोलीस निरीक्षक श्री. भंडे, ग्रामसेवक एकुरके, तसेच मौजे आरी येथील दोन्ही गटांतील समाज बांधव, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे आरी येथे गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या वेळी झेंडा लावण्याच्या ठिकाणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादामुळे गावातील शांतता व सामाजिक ऐक्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव शांततेत व सलोख्याने पार पडावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत सदर शांतता बैठकीचे आयोजन केले. बैठकीदरम्यान दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना आपापले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही बाजूंचे मुद्दे संयमाने व निष्पक्षपणे ऐकून घेत प्रशासनाच्या वतीने परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. परस्पर संवाद व समन्वयाच्या माध्यमातून गैरसमज दूर करून वादाचा मूळ मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र चौधर यांनी मार्गदर्शन करताना गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. कोणत्याही प्रकारच्या अफवा, गैरसमज किंवा उत्तेजनात्मक कृतींना बळी न पडता सर्वांनी संयम बाळगावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच तहसीलदार व इतर मान्यवरांनीही सामाजिक ऐक्य, बंधुभाव व परस्पर सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित करत, गावातील परंपरा व संस्कृती जपून एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.सखोल चर्चेनंतर दोन्ही गटांनी परस्पर सहमतीने वाद मिटवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने समाजमंदिरात सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येईल, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमुळे मौजे आरी गावात सलोखा व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संभाव्य तणाव पूर्णतः निवळला आहे. आगामी उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येणार असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
सदर शांतता बैठकीमुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत, आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

Follow Us Now