ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणे, शेतीविषयक तक्रारी व वादांचे तातडीने निवारण करणे तसेच पोलीस आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे या उद्देशाने, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत दिनांक 16 मार्च 2026 ते 30 मे 2026 या कालावधीत राबविण्यात आलेला “पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर” हा अभिनव उपक्रम ग्रामीण भागात अत्यंत प्रभावी आणि यशस्वी ठरला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांसाठी थेट शेतशिवारात आणि बांधावर न्याय मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला.
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांना शेती रस्ते, बांधावरील वाद, पाणी वाटप, अतिक्रमण, मालकी हक्क, वहिवाट, पीक काढणी, जमिनीचे वाटप तसेच विविध कौटुंबिक व सामाजिक वादांना सामोरे जावे लागते. अशा प्रश्नांसाठी शेतकऱ्यांना पोलीस ठाणे व इतर कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकण्याचा आणि त्यांचे तातडीने निवारण करण्याचा लोकाभिमुख उपक्रम राबविला.
दिनांक १६ मार्च २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहिमेअंतर्गत गावोगावी, शिवारात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला. या कालावधीत लातूर जिल्ह्यातील तब्बल १००२ गावाना ग्रामभेटी देण्यात आल्या. ग्रामभेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारी, अर्ज व वादांची माहिती घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांना समजावून सांगून समुपदेशन व मध्यस्थीच्या माध्यमातून जागीच सामोपचाराने तोडगा काढण्यात आला.
या विशेष मोहिमेदरम्यान प्राप्त झालेल्या एकूण ६६३ शेती व जमीनविषयक तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले. त्यामध्ये
-मालकी हक्क व वहिवाट संदर्भातील ११९ प्रकरणे,
-बांधावरून झालेल्या भांडण व वादांची १३६ प्रकरणे,
-पाणी हक्क व पाणी वाटप संदर्भातील ४९ प्रकरणे,
-मोजणी संदर्भातील ५० प्रकरणे, -जमिनीच्या वाटप संदर्भातील ५७ प्रकरणे,
-पीक काढणी संदर्भातील १० प्रकरणे -तसेच इतर स्वरूपाची ३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे शेतीसंदर्भातील अनेक तंटे न्यायालयीन वादात किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाचला असून ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा टिकविण्यास मदत झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नसून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेली लोकाभिमुख संस्था आहे, ही भावना अधिक बळकट झाली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, “शेतकरी हा आपल्या समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या समस्या वेळेत सोडविणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर’ या उपक्रमातून आम्ही केवळ तक्रारींचे निवारण केले नाही, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सातत्यपूर्ण ग्रामभेटी आणि विशेष मोहिमांमुळे शेतीविषयक अनेक तंटे सामोपचाराने मिटत असून ग्रामीण भागात शांतता, सलोखा आणि कायद्याबद्दलचा आदर वाढत असून भविष्यातही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येईल.”
“पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर” हा उपक्रम लातूर जिल्हा पोलीस दलाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरत असून ग्रामीण भागातील तंटामुक्ती, संवाद आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.




