लातूर – मानवी जीवनातील दुःख, संकटे व मानसिक अस्थिरतेवर मात करण्यासाठी अध्यात्म हा एकमेव प्रभावी मार्ग असून, श्रीमद् भागवत कथा हे त्याचे सर्वोच्च साधन आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. मंगलताई लोमटे कळंबकर यांनी केले. मजगे नगर येथील ‘कैलास निवास’ येथे कव्हेकर परिवाराच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वेद-पुराणांच्या गाभ्यातून आलेल्या भागवत कथेच्या माध्यमातून केवळ वर्तमान नव्हे, तर पूर्वजांचाही उद्धार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
भागवत कथा ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती आत्मशुद्धी, मन:शांती आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणारी आध्यात्मिक साधना आहे. जीवनात संकटांची छाया असतानाही श्रद्धा, निश्चय आणि भक्ती यांच्या बळावर भागवत कथा पूर्णत्वास नेता येते, याचे उत्तम उदाहरण कव्हेकर परिवाराने घालून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.
अधिक मास हा दानधर्म, साधना व पुण्यसंचयाचा कालखंड मानला जातो. या पवित्र काळात भागवत कथा आयोजित करून समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याचे कार्य कव्हेकर परिवाराने केले आहे. त्यामुळे या कार्याचे विशेष महत्त्व अधोरेखित होते, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्रमोदिनी पाटील कव्हेकर, आश्विनी किशोर पाटील, अनिताताई कदम, रणजित पाटील कव्हेकर, प्रभाग 18 च्या नगरसेविका आदिती अजित पाटील कव्हेकर, सत्यवती चेवले, माजी नगरसेवक सुभाषअप्पा सुलगुडले, बालाजी शेळके, शिवकुमार बिराजदार, संध्याताई जाधव, अरुणाताई कांदे, बालाजी गाडेकर, राजाराम चोबळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर चाटे महाराज, तानाजी झुंजे पाटील, बाबासाहेब देशमुख, दिगंबर शेटे, मोहन गंगथडे, दिगंबर बोराळे, सिद्धेश्वर उकीरडे, शशिकांत हांडे, चंद्रकांत वैरागकर, बालाजी लद्दे, बाळासाहेब शिंदे, राजकुमार शेटे, सुनिल शर्मा, अर्चना नलवाडे, विद्याताई देशमुख, ज्योतीताई मंठाळे, महादेवी शेटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंगलताई लोमटे म्हणाल्या की, भागवत कथेमध्ये गोकर्णाचा जन्म, त्यांच्या कुटुंबाचा उद्धार, तसेच धुंदलीचा उद्धार यांसारख्या प्रसंगांमधून जीवनातील पाप-पुण्य, कर्म आणि मोक्ष यांचा सखोल विचार मांडला आहे. अधिक मासामध्ये घरी भागवत कथा ठेवणे हे अत्यंत पुण्यकारक कार्य मानले जाते. या कथेमुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अशक्य वाटणारी कार्येही सहज साध्य होतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजन समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच ह.भ.प. मंगलताई लोमटे यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक-भक्त उपस्थित होते.
अडचणींशी लढण्याचे बळ भागवत कथेने दिले – प्रतिभाताई पाटील कव्हेकर
यावेळी बोलताना प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या की, ह.भ.प. मंगलताई लोमटे यांच्या भागवत कथा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. मात्र स्वतःच्या घरी प्रथमच भागवत कथा आयोजित करण्याचे भाग्य मला लाभले. दरम्यान घरगुती अडचणींमुळे कथा यशस्वी होईल की नाही अशी शंका होती. तरीही मनातील श्रद्धा आणि जिद्द कायम ठेवून कथा घेण्याचा निर्धार केला. देवाच्या कृपेने आज या भागवत कथेचा शुभारंभ अत्यंत उत्साहात झाला असून, संकटमुक्तीसाठी अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. या कथेमुळे अडचणींशी लढण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळे सातही दिवस ही कथा भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच परिसरातील सर्व भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.




