हेल्मेटचा अभाव ठरला जीवघेणा! उदगीर-लातूर मार्गावरील अपघाताने पुन्हा अधोरेखित केले दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचे महत्त्व.

SHARE:

उदगीर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात हेल्मेट न घातल्यामुळे एका दुचाकीस्वारास आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
उदगीर-लातूर रोडवरील लोहारा गावाच्या पश्चिमेस असलेल्या परिसरात कुमठा गावाकडून येणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराचा करडखेलकडे जाणारे लहु मारुती डोंबाळे (वय ३५ वर्षे, रा. गणेशवाडी) यांच्याशी अपघात झाला. अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वारास गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.विशेष बाब म्हणजे या अपघातामध्ये मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता दुचाकीच्या मागील बाजूस कोणतेही नुकसान नसल्याचे दिसून आले. पुढील बाजूसही केवळ हेडलाईटच्या काचेचे किरकोळ नुकसान झालेले होते. वाहनाच्या धडकेचे स्वरूप इंग्रजी “T” अक्षराप्रमाणे मध्यभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच मयताच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या इतर कोणत्याही दुखापती आढळून आलेल्या नाहीत. अपघातानंतर रस्त्यावर पडताना डोक्यास मार लागल्याने व डोक्यावर झालेल्या जखमेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. जर संबंधित व्यक्तीने हेल्मेटचा वापर केला असता तर त्याचा जीव वाचण्याची दाट शक्यता असल्याचे घटनास्थळावरील निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.
घटनास्थळी मयताचे वडीलही उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना अपघाताचे ठिकाण दाखवून संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी अत्यंत भावनिक होत त्यांनी, “माझ्या मुलाने हेल्मेट घातले असते तर तो आज शंभर टक्के जिवंत असता. हेल्मेट न घालणे हीच त्याची मोठी चूक ठरली,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
ही घटना १० जून रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, नातेवाईकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीनंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व दुचाकी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा. अनेकदा अपघातांमध्ये वाहनाचे फारसे नुकसान होत नसतानाही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जीवितहानी होते. त्यामुळे हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now