लातूर, दि. 12 : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी पक्षाच्या प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसह लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे यांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत पावसाळ्यादरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेत त्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.
यावेळी शहरातील प्रमुख नाले आणि भुयारी गटारांची तातडीने व पूर्ण क्षमतेने साफसफाई करणे, रस्त्यांवरील धोकादायक खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजविणे, वादळी वाऱ्यामुळे अपघात होऊ नयेत म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी आपत्कालीन पंपिंग व्यवस्था सज्ज ठेवणे तसेच जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री कामांवर समाधान न मानता प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून सर्व मान्सूनपूर्व कामे पारदर्शकपणे आणि युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामांच्या गुणवत्तेवर आणि प्रगतीवर भाजपची टीम प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष ठेवणार असल्याचे देविदास काळे यांनी सांगितले.
बैठकीस भारतीय जनता पार्टीचे प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



