लातूर शहर हे राज्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारताच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थी आपल्या शैक्षणिक ध्येयपूर्तीसाठी लातूरमध्ये येतात.
या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, अभ्यासातील नियोजन, स्पर्धेतील मानसिकता, तणाव व्यवस्थापन, नैतिक मूल्ये तसेच वैयक्तिक सुरक्षितता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल, समतोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून योग्य दिशा, नियोजन आणि शिस्त यांची नितांत गरज आहे. नियोजनबद्ध ध्येय निश्चित करून त्यानुसार सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभ्यास केल्यास कोणतेही उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा योग्य अंदाज घेऊन, आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे आणि पारंपरिक चौकटीबाहेरही संधी शोधाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
स्पर्धात्मक वातावरणात निर्माण होणाऱ्या ताण-तणावावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, स्पर्धेचा अनावश्यक ताण न घेता सकारात्मक दृष्टीकोनातून तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. तणाव हा जीवनाचा एक भाग असला, तरी त्याचे योग्य व्यवस्थापन करता आले, तर तोच तणाव प्रगतीचे साधन ठरू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, संतुलित दिनचर्या, योग्य विश्रांती आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण व्यसन हे केवळ आरोग्यालाच नाही, तर करिअर आणि भविष्यासाठीही घातक ठरते. “आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अटोकाट प्रयत्न करा, अपयश आले तरी खचून जाऊ नका,” असे आवाहन करत त्यांनी चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, “परीक्षेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यास नैराश्यातून कोणतेही चुकीचे पाऊल उचलणे हा कोणताही पर्याय नाही. आत्महत्या किंवा गैरमार्ग हे समस्येचे उत्तर नसून, धैर्याने पुन्हा उभे राहणे हाच खरा मार्ग आहे.” त्यामुळे प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासावी, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फक्त परीक्षा व त्यामध्ये मिळणारे गुण हेच आयुष्याचे अंतिम मोजमाप नाही. शिक्षणाचा खरा उद्देश सर्वांगीण, गुणसंपन्न आणि मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व घडवणे हा आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, योग्य संगत ठेवावी आणि अल्पवयात कोणत्याही वाम मार्गाचा अवलंब करू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. लातूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लातूर पोलीस दल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील, सतर्क आणि कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण, तणाव, छेडछाड, दबाव किंवा अन्य समस्या भासल्यास त्यांनी कोणताही संकोच न बाळगता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी लातूर पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मुलींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच विद्यार्थ्यांनी आवश्यकतेनुसार हेल्पलाईन सेवांचा वापर करावा, असे सांगत लातूर पोलिसांनी खालील संपर्क क्रमांक प्रसिद्ध केली असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणीच्या वेळी निसंकोच पणे वापर करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व तातडीच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक.
पोलीस नियंत्रण कक्ष : ११२/ ०२३८२-२४२२९६
महिला हेल्पलाईन : १०९१
बाल हेल्पलाईन : १०९८
सायबर गुन्हे हेल्पलाईन : १९३०
विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची अडचण, संशयास्पद हालचाल किंवा त्रास जाणवल्यास त्वरित व निर्भयपणे या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ वर्धापन दिनाचा उत्सव नसून, त्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देणारा, आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरला.
लातूर पोलीस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्पर असून, त्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी कायम कटिबद्ध आहेत.




