लातूर : अहमदपूरमध्ये पत्रकारांशी पोलिसांची धक्काबुक्की; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी

SHARE:

लातूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात पत्रकारांशी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आणि मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना पोलिसांनी अडवत हुज्जत घातल्याने प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी तसेच संताप व्यक्त होत आहे.

कार्यक्रमस्थळी अहमदपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले, किनगावचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक डोके तसेच इतर पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना रोखत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकारांनी आपले कर्तव्य पार पाडत उपमुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांकडून झालेल्या या वर्तणुकीमुळे संतापाची लाट उसळली.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कानावर पत्रकारांनी घातला. मात्र, त्यांनी पत्रकारांचे म्हणणे फक्त ऐकून घेतल्याचे सांगितले जात असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही तत्काळ कारवाई अथवा स्पष्ट भूमिका समोर आली नाही.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा पद्धतीने वागवले जात असल्याने लातूर जिल्ह्यातील पत्रकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रसारमाध्यमांना अडवणे, धक्काबुक्की करणे आणि दडपशाहीची भाषा वापरणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now