ट्युशन एरियाला ‘ स्पेशल एज्युकेशन झोन’ चा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा, भाजपानेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दिला शब्द.

SHARE:

लातूर, विशेष प्रतिनिधी : जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी दिलेल्या,‌ लातूर इंडस्ट्रियल इस्टेट वसाहतीतील अनेक कोचिंग क्लासेस , हॉस्टेल्स,  खानावळी आणि इतर व्यवसाय बंद करण्याच्या आदेशाला आव्हान देत, या उद्योग भवन परिसरास‌ ‘ स्पेशल एज्युकेशन झोन’ म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूर पॅटर्न बचाव कृती समितीने ट्युशन एरियात आयोजित केलेल्या बैठकीत समितीचे सर्वतोपरी समर्थन केले. या समितीच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा दिलासाही देत त्यांनी, गरज पडल्यास या प्रश्नावर न्यायालयाचे दरवाजे ठेवण्याचा इशाराही दिला.
जिल्हा उद्योग केंद्राच्या नव्या आदेशा मुळे हवालदिल झालेल्या ट्युशन एरियातील अन्य व्यावसायिकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित सिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे सरचिटणीस प्रवीण कस्तुरे नगरसेवक व माजी स्थायी सभापती ॲड. दीपक मठपती, नगरसेवक विनय जाकते ,ऋषिकेश राजे, राजश्री धोत्रे,  ॲड. मीना गायकवाड, प्रवीण सावंत पुनित पाटील ,ओम धरणे आदी उपस्थित होते.
डॉ. अर्चनाताई पाटील पुढे म्हणाल्या, शिक्षणाचा लातूर पॅटर्न घडविण्यात शहरासह लातूर जिल्ह्यातील विविध संस्थाचालकांचा सिंहाचा वाटा असला तरी यामध्ये शिकवणी चालक यांच्यासह संबंधित व्यावसायिकांचा खारीचा वाटा आहे. शिक्षणातील या लातूर पॅटर्नमुळे लातूरच्या अर्थकारणाला गती मिळाली असून त्यामुळे लातूर शहराच्या विकासास हातभार लागला आहे. ‌ नीट पेपर फुटी मुळे हा पॅटर्न बदनाम करण्याचा डाव काही जणांकडून सुरू असला तरी लातूर पॅटर्न हे  बावन्नकशी सोने आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. हा पॅटर्न  जपण्याची आणि त्यास बदनामीपासून वाचविण्यासाठी लातूरकर म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. लातूर पॅटर्न काळीमा लागणार नाही याची दक्षता आपण निश्चितच घेऊ. उद्योग भवन परिसरातील शिकवणी चालकांसह व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न आज संकट म्हणून आपल्यासमोर उभा ठाकला आहे. या संकटाला संधी समजून आपण सर्वजण लातूरचे अर्थकारण जशास तसे ठेवून लातूर पॅटर्नला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी परिसराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी या परिसराला स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. या संदर्भात आपण उद्या सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांची वेळ घेऊन शिष्टमंडळासह त्यांच्या समोर  व्यावसायिकांची बाजू  मांडणार आहोत .
समितीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ.‌ शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना साकडे घालू, असे आश्वासन अर्चनाताईंनी दिले. मुख्यमंत्री निश्चितच याचा विचार करून न्याय देतील असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या बैठकीच्या सुरुवातीस लातूर पॅटर्न बचाव कृती समितीच्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडत आपल्या अडचणींचा आणि व्यथांचा पाढा  अर्चनाताई पाटील यांच्यासमोर वाचला. बैठकीपूर्वी अर्चनाताईंनी ट्युशन एरिया भागातील काही व्यवसायिकांना समक्ष भेटून त्यांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेतले.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now