लातूर, प्रतिनिधी : NEET 2026 पेपर फुटी प्रकरणात नाव समोर आलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या RCC Classes वर कठोर कारवाई करण्यात यावी, क्लासेसचा परवाना रद्द करावा, विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, या मागण्यांसाठी आज समस्त लातूरकरांच्या वतीने जिल्हाधिकारी, लातूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की, सदर प्रकरणाचा कायदेशीर निकाल लागेपर्यंत RCC Classes ने नवीन अकरावी-बारावी तसेच इतर प्रवेश प्रक्रिया तात्काळ थांबवावी. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून क्लासेसचे कामकाजही बंद करण्यात यावे.
यासंदर्भात पुढील दोन दिवसांत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास दि. 6 जून रोजी RCC Classes समोर विविध विद्यार्थी संघटना, युवा संघटना, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत भव्य निदर्शने व आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी कुलदीप सूर्यवंशी, किरण चव्हाण, ॲड. राहुल मातोळकर, राणा चव्हाण, रोहित चवळे, अक्षय चवळे, राजाभाऊ चौगुले, नंदकिशोर साळुंखे, प्रशांत सुरवसे, धनराज शिंदे, बजरंग बप्पा चव्हाण, निलेश मांदळे आदी उपस्थित होते.




