लातूरातील भोंदूबाबाविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल.

SHARE:

लातूर, दि. ३ (प्रतिनिधी) : लातूरजवळील औसा रोडवरील खोपेगाव शिवारातील सैलानी बाबा दरबार देवस्थान येथे तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे, ताईत व विविध धार्मिक उपायांच्या माध्यमातून दुर्धर आणि असाध्य आजार बरे करण्याचे दावे करून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मारुती चंदनराव मोरे या कथित भोंदूबाबाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन अधिनियम, २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) लातूर शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सैलानी बाबा दरबारात प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित व्यक्तीच्या कार्यपद्धतीची पडताळणी केली. या तपासणीदरम्यान मारुती मोरे हा स्वतःकडे दुर्धर आजारांवर उपचार असल्याचा दावा करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच कौटुंबिक वाद, व्यवसायातील अडचणी, संततीप्राप्ती यांसारख्या समस्यांवर ‘दैवी उपाय’ असल्याचे सांगून लोकांकडून पैसे घेत असल्याचे आढळून आले.

तपासात तो गळ्यात घालण्यासाठी किंवा दंडावर बांधण्यासाठी ताईत देत असून त्यासाठी १,१५१, १,५५१ आणि २,१५१ रुपये आकारत असल्याचे समोर आले. विविध आजारांसाठी स्वतंत्र शुल्क नमूद असलेले रेटकार्डही त्याच्याकडे असल्याचे आढळले. काही व्यक्तींना तेल पिण्यास व अंगाला चोळण्यास देणे, लिंबू कापण्यास सांगणे तसेच महिलांना मुलगा होण्याची हमी देण्यासारखे प्रकारही उघडकीस आल्याचे अंनिसने म्हटले आहे. या सर्व बाबींचे ऑडिओ व व्हिडिओ पुरावे कार्यकर्त्यांनी संकलित केले आहेत.

या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने १४ मे २०२६ रोजी ग्रामीण पोलीस ठाणे, लातूर येथे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. तक्रारीची दखल घेत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी फिर्यादी म्हणून पुढाकार घेत १ जून २०२६ रोजी गुन्हा क्रमांक १०६/२०२६ नुसार जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला.

या कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस निरीक्षक डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधानसचिव रुक्साना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दशरथ भिसे, जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले, बुवाबाजी विरोधी संघर्ष सहकार्यवाह दगडूसाहेब पडिले, डॉ. गणेश गोमारे, समाधानताई माने तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

 

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now