लातूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, हातभट्टी व्यवसाय आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दलाने व्यापक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक ०२ जून २०२६ रोजी जिल्हाभर एकाच वेळी राबविण्यात आलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवैध दारू व्यवसायिकांविरोधात मोठी कारवाई करून एकाच दिवसात ८ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापेमारी करण्यात आली. या कारवाईत हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन, कच्चा माल आणि उत्पादन साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. जप्त केलेले हजारो लिटर रसायन व दारू निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले असून अनेक आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई रेणापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वसंतनगर तांडा परिसरात केली. या ठिकाणी गुप्तपणे आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून सलग तीन गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान हजारो लिटर गुळमिश्रित रसायन, निकृष्ट दर्जाचा गुळ, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोटारी, फॅन, प्लास्टिकच्या टाक्या, रबरी ट्यूब, घागरी, पाईप तसेच हातभट्टी दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मोटारसायकली असा एकूण सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हातभट्ट्या जागेवरच उद्ध्वस्त करण्यात आल्या. दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, कच्चा माल व इतर साहित्य पंचांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.
जिल्हाभरातील विविध कारवायांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून अंदाजे ३ लाख १२ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, “लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. नागरिकांनीही अवैध दारू व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी.”लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील ही मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरू राहणार आहे.




