वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष जीवावर बेतले; चाकूर बायपासवरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू.

SHARE:

चाकूर शहरालगत असलेल्या नांदेड रोडवरील बायपास क्रॉसिंग पॉईंट येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या आयशर कंटेनर चालकाविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास चाकूर बायपास क्रॉसिंग पॉईंट येथे आयशर कंटेनर टेम्पो क्रमांक MP-09-GH-1020 च्या चालकाने वाहन हयगयीने, भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अपघात घडवून आणला. या अपघातात TVS एक्सेल-100 दुचाकी क्रमांक MH-24-BA-8409 वरून प्रवास करणारे जनार्धन काळबा येणगे व त्यांची पत्नी सविता जनार्धन येणगे (दोघे रा. तेलगाव, ता. अहमदपूर) यांचा मृत्यू झाला. तसेच मारुती सुझुकी वॅगनार क्रमांक MH-24-BR-7121 मधून प्रवास करणारे श्रेयस सचिन वाघमारे यांचाही मृत्यू झाला.
याशिवाय श्रेयश स्वामी व सुशील स्वामी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दत्तात्रय विद्याधर येणगे (रा. चापोली, ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुरनं. ३१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर विभागाचे प्रभारी चाकूर श्री. भातलवंडे, पोलीस निरीक्षक श्री. भंडे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली.
प्राथमिक तपासात अपघातग्रस्त दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर केलेला नसल्याचे तसेच चारचाकी वाहनातील प्रवाशांनी सीटबेल्ट परिधान केला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघाताचे कारण कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा असला तरी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे आणि वाहतूक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे जीवितहानीची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत जनजागृती केली जात असून, नुकतेच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा उद्देश रस्ते अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे.
या दुर्घटनेच्या निमित्ताने सर्व वाहन चालक व प्रवाशांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, दुचाकीवर हेल्मेट आणि चारचाकीमध्ये सीटबेल्टचा अनिवार्य वापर करावा, तसेच वेगमर्यादेचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन चाकूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
“एक क्षणाची निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांकडे केलेले दुर्लक्ष संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.”

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now