नांदेड मधील कामठा जुगार अड्डयावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड (41) आरोपींविरुद्ध कारवाई, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

SHARE:

नांदेड शहरा नजीक, गाडेगाव रोडवरील कामठा गावात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांना ‘खबर’ हेल्पलाइन वरून प्राप्त झाल्याने, त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एक पथक हद्दीत रवाना केले होते.

 

सदर माहितीवरून, दिनांक 27/03/2026 रोजी, पथकाने गाडेगाव रोडवरील कामठा परिसरात जगनलाल  देविलाल यादव यांच्या मालकीच्या जागेत एका टिन शेडमध्ये पपलू नावाचा जुगार खेळणाऱ्या (41) इसमांना ताब्यात घेऊन, त्‍यांच्याकडून 1,50,950/- रुपयांची रोकड, (37) मोबाईल व (12) मोटर सायकल असा एकूण 11,47,950/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्‍यांचेविरुध्द पोलीस ठाणे विमानतळ गुरनं 112/2026 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्यातील सपोनि संतोष जोंधळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

जुगाऱ्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र : उपलब्ध कागदपत्रांप्रमाणे, कामठा येथील सदर जुगार अड्ड्यावर जुगाऱ्यांना जुगार खेळण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण केंद्र हे ‘राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’, चिंचवडगांव, ता. वडवणी, जिल्हा बीड यांचे मार्फत चालविण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात विशेष पथकाने केलेल्या कारवाईत, येथील जुगार अड्डयावर (41) आरोपी, पपलू नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

 

चिंचवडगाव येथील सदर क्रीडा व सांस्कृतिक मंडळांने परिक्षेत्रात अनेक ठिकाणी, अशा प्रकारची ‘जुगार प्रशिक्षण केंद्रे’ सुरू केल्याची माहिती असून, यापूर्वी परभणी जिल्ह्यातील मौजे लिमला, तालुका ताडकळस व मौजे मर्डसगाव, तालुका गंगाखेड  येथील प्रशिक्षण केंद्रांवर धाड टाकून, विशेष पथकाने अनेक जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

 

आपल्या भागात, अशा प्रकारची जुगार प्रशिक्षण केंद्र आढळून आल्यास, त्याची माहिती  देण्याचे आवाहन, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

 

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकॉ/ कामाजी गवळी यांचा सहभाग होता. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून, त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस घोषित करून, प्रोत्साहित केले आहे.

Leave a Comment

Follow Us Now