सीट बेल्ट न वापरण्याची एक चूक; दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर.किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

SHARE:

अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी लातूर पोलीस प्रशासन आणि विविध सामाजिक संस्था सातत्याने जनजागृती करत आहेत. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांचे पालन याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. मात्र काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना आजही घडत आहेत.
किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका भीषण अपघाताने याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. दिनांक २५ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास जढाळा गावाजवळ घडलेल्या या अपघातात एका २० वर्षीय तरुण चालकासह अवघ्या १७ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर एका कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले. या घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हाटक्याळ (ता. कंधार, जि. नांदेड) येथील विशाल व्यंकटराव मिरकले हे आपल्या पत्नी व लहान मुलासह इरटीगा कार (एमएच-१५ जेएक्स-१५२८) मधून बेलगावकडे जात होते. वाहन चालक महादेव पांडुरंग नरहारे (वय २० वर्षे, रा. वरवंटी, जि. लातूर) हा वाहन चालवत होता. पहाटेच्या वेळी प्रवास सुरू असताना जढाळा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर प्रचंड वेगाने आदळली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. चालक महादेव नरहारे याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर विशाल मिरकले यांचा अवघा १७ महिन्यांचा मुलगा इरेश यालाही या अपघातात प्राण गमवावे लागले. विशाल मिरकले व त्यांची पत्नी मेघा मिरकले हे गंभीर जखमी झाले.

एअरबॅग उघडली, पण सीट बेल्ट नसल्याने जीव वाचला नाही.

या अपघाताच्या तपासादरम्यान समोर आलेली बाब अत्यंत धक्कादायक आणि प्रत्येक वाहनचालकासाठी गंभीर इशारा देणारी आहे. मृत चालक महादेव नरहारे याने सीट बेल्ट अंगावर न लावता केवळ मागील बाजूस खोचून ठेवला होता. त्यामुळे अपघाताच्या वेळी वाहनातील एअरबॅग उघडूनही त्याचा अपेक्षित फायदा चालकाला मिळाला नाही. एअरबॅग ही सीट बेल्टसोबतच प्रभावीपणे काम करते. सीट बेल्ट नसल्यास एअरबॅगचे संरक्षण अपुरे पडते आणि जीवितहानी होऊ शकते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले.
याउलट चालकाच्या शेजारी बसलेले विशाल मिरकले यांनी सीट बेल्टचा वापर केला होता. त्यामुळे अपघात अत्यंत भीषण असूनही त्यांना तुलनेने कमी दुखापत झाली आणि त्यांचा जीव वाचला. एका वाहनात बसलेल्या दोन व्यक्तींच्या सुरक्षिततेतील हा फरक केवळ सीट बेल्ट वापरला किंवा न वापरला यामुळे निर्माण झाला.

वाहतूक नियम म्हणजे बंधन नव्हे, जीवनरक्षक कवच.

लातूर जिल्हा पोलीस दल आणि किनगाव पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट व सीट बेल्ट वापराबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. विविध ठिकाणी वाहतूक सुरक्षा अभियान, शाळा-महाविद्यालयांमधील मार्गदर्शन कार्यक्रम, रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून हेल्मेट वाटप, तसेच वाहनचालकांना सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य सुरू आहे.तरीदेखील काही नागरिक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना सीट बेल्ट हा केवळ दंड टाळण्यासाठीचा नियम वाटतो. प्रत्यक्षात तो अपघाताच्या वेळी शरीराला सुरक्षित ठेवणारा जीवनरक्षक उपाय आहे. वाहनातील एअरबॅग, आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि मजबूत वाहन यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा चालक व प्रवासी सीट बेल्ट वापरतात.
या अपघातात एका तरुणाने आपले भविष्य गमावले, एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला आणि दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लातूर जिल्हा पोलीस दलाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहन चालविताना अथवा प्रवास करताना चालकासह पुढील आणि मागील आसनावरील सर्व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करावा. वेगावर नियंत्रण ठेवावे, मोबाईलचा वापर टाळावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे.

“सीट बेल्ट लावण्यासाठी काही सेकंद लागतात, पण तोच सीट बेल्ट आयुष्यभराचा श्वास वाचवू शकतो.”

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now