लातूर (प्रतिनिधी): लातूर शहरातील बसस्थानक परिसरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या लूटमारीच्या घटना वाढत असून, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी मंठाळे नगर येथील शिवकुमार बिराजदार व ज्यांची लूटमार झालेली आहे ते संपूर्ण दोन्ही परिवारातील कुटुंबीय उपस्थित होते.
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चाकूर येथील मारुती होणकर हे आपल्या कुटुंबासह बसमध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने चोरल्याची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच, दि. १४ एप्रिल रोजी विलास उमाटे यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना नळेगाव येथे बसमध्ये चढलेल्या महिलांनी त्यांच्या पत्नीची दागिन्यांची बॅग चोरून बावलगाव पाटी येथे उतरल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या बॅगेमध्ये सुमारे २२ तोळे सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले जाते.
या दोन घटनांवरून लातूर बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची मालिका सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, यापूर्वीही अनेक प्रवासी लुटले गेल्याच्या तक्रारी आहेत.
पीडितांनी तात्काळ मदतीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता गांधी चौक पोलीस स्टेशनकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. संबंधित पोलीस निरीक्षकांना वारंवार फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तसेच स्टेशन डायरीवरील कर्मचाऱ्यांनीही दोन तासांपर्यंत दखल घेतली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांनी या निवेदनात केला आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांना मदतीचे आदेश दिल्यानंतर रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्यात आला.
या सर्व प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून
या संदर्भात बालाजी पाटील चाकूरकर यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.



