Nepal Govt Ban Social Media : नेपाळ सरकारने गुरुवारी फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यानंतर देशभरातील तरुणांनी बंड पुकारले आहे. नेपाळमध्ये सरकारच्या या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. काठमांडूमध्ये या निर्णयाविरोधात तरुण मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. तरुणांनी संसदेबाहेरही निदर्शने केली. मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा दलांनी काठमांडूला वेढा घातला आहे.
नेपाळने गुरुवारी फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातली कारण त्यांनी निर्धारित वेळेत या प्लॅटफॉर्म्सनी संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे त्याची नोंदणी केली नाही. नेपाळमधील तरुण या निर्णयाविरुद्ध तीव्र निषेध करत आहेत. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि हवेत गोळ्या झाडल्या. प्रचंड गर्दी नियंत्रणाबाहेर जात असून पोलिस आणि सुरक्षा दलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तरुणांतील काहींनी भिंतीवरून उडी मारून संसदेत प्रवेश केला. भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंद करण्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या निदर्शकांनी संसद भवनात प्रवेश केल्यानंतर आज होणारी राष्ट्रीय सभेची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा इशारा
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी रविवारी नोंदणी नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाष्य केले आणि म्हटले की देशाला कमकुवत करणे कधीही सहन केले जाणार नाही, तर विविध गटांनी या निर्णयाला विरोध केला. नेपाळने गुरुवारी फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातली. मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी 28 ऑगस्टपासून सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
मेटा, अल्फाबेट, एक्स, रेडिटची मुंदत संपली
बुधवारी रात्री मुदत संपल्यानंतरही, मेटा (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप), अल्फाबेट (यूट्यूब), एक्स (पूर्वीचे ट्विटर), रेडिट आणि लिंक्डइन यासारख्या कोणत्याही प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अर्ज सादर केले नाहीत.
“सोशल मीडियाच्या विरोधात नाही, पण…”
सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (युनिफाइड मार्क्सवादी-लेनिनिस्ट) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ओली म्हणाले की पक्ष नेहमीच विसंगती आणि अहंकाराला विरोध करेल आणि राष्ट्राला कमकुवत करणारे कोणतेही कृत्य कधीही स्वीकारणार नाही. मायरेपब्लिकाच्या वृत्तानुसार, पंतप्रधान म्हणाले की पक्ष सोशल मीडियाच्या विरोधात नाही, परंतु जे नेपाळमध्ये व्यवसाय करतात, पैसे कमवतात आणि तरीही कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांना स्वीकारले जाऊ शकत नाही.
