Impure Water Supply : पाणी म्हणजे जीवन.. मात्र हेच पाणी तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. कारण राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पाणी विषारी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय..भुजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालंय.
पाहूया एक विशेष रिपोर्ट…
अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या मूलभूत गरजा आहेत. पाणी तर जीवन आहे. मात्र हेच पाणी राज्यातल्या अनेक भागांमधल्या नागरिकांच्या जीवावर उठण्याची भीती आहे. कारण राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या भुजलात विषारी घटक आढळल्याचं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालंय. या रेड झोनमधल्या जिल्ह्यांच्या भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे. आणि ते आरोग्यासाठी घातक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा 45 मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे. राज्यातल्या पाण्यात हे प्रमाण अधिक आढळलंय. केंद्रीय भूजल मंडळाच्या ‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024’ मध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राज्यातल्या वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड, जळगाव या जिल्ह्यांमधील पाणी विषारी आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सावध करणारा हा अहवाल आहे. नायट्रेटयुक्त पाण्यामुळे पोटाचा कॅन्सर, लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’, जन्मदोष, जन्मजात व्यंग असे आजार होऊ शकतात. सांडपाण्याचे गैरव्यवस्थापन, वॉटर ट्रीटमेंट प्लांटची योग्य देखभाल न करणे आणि रासायनिक खते हे नायट्रेटचे मुख्य स्रोत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी काही उपाय योजण्याची गरज आहे.
पाणी पिण्यापूर्वी हे उपाय करा.
– पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित पर्याय वापरावे
– बोअरवेल किंवा विहिरीचं पाणी असल्यास वर्षातून एकदा नायट्रेटची तपासणी करा
– नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्यास उकळलेले पाणी प्या
– परिसरातील नायट्रेटच्या स्रोतांचा शोध घ्या आणि ते दूर करा
केवळ महाराष्ट्रच नाही तर राजस्थान, तेलंगणा, तमिळनाडू आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यातील काही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे देशातले तब्बल 38 कोटी लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी नागरिकांना पुरवण्यासाठी सरकारनंही काही उपाय योजायला हवेत.
